प्रणय नरेश नन्नावरे असं हत्या झालेल्या २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर गौरव कारडा असं ३४ वर्षीय जखमी तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. सौम्य देशमुख (वय २५), रोहित शेंबेकर (वय २३), मेहुल रहाटे (वय २६), राजू चावला (वय २४) , रोहित यादव (वय २७) , अनुज यादव (वय २५) आणि तुषार नानकानी (वय २७) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
advertisement
नेमकी घटना काय?
मृत तरुण प्रणय नरेश नन्नावरे (वय २४) हा शेअर मार्केटचे काम करायचा, तर त्याचा मित्र गौरव कारडा (वय ३४) एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे कामाला आहे. या दोघांनी मुंबईवरून पार्टी करण्यासाठी नादिया ऊर्फ अँरन नावाच्या तरुणीला नागपुरात बोलावलं होतं. गुरुवारी रात्री हे दोघे आपल्या इतर दोन मित्रांसह तरुणीला घेऊन नागपूरच्या 'दाबो पब'मध्ये गेले होते.
पबमधील वादाचं रुपांत हत्येत
पार्टी रंगात आलेली असताना, शेजारच्या टेबलवर बसलेला मेहुल नावाचा तरुण त्यांच्या टेबलाजवळ आला. त्याने सोबत असलेल्या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचा मोबाईल नंबर मागितला. ही बाब प्रणय आणि गौरवला आवडली नाही. यावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. आरोपी सौम्य देशमुख, मेहुल आणि त्यांच्या साथीदारांनी "तुम्हाला पाहून घेऊ," अशी धमकी देऊन तिथून काढता पाय घेतला.
पाठलाग करून जीवघेणा हल्ला
पहाटे ४:२० च्या सुमारास प्रणय आणि गौरव पबमधून बाहेर पडले. आरोपी आधीच त्यांच्या मागावर होते. प्राइड हॉटेल समोर आरोपींनी त्यांना गाठले आणि लोखंडी सळईने त्यांच्यावर अमानुष प्रहार केले. या हल्ल्यात प्रणयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गौरव कारडा हा देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या खामला चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. एका मोबाईल नंबरसाठी एका तरुणाचा बळी गेल्याने नागपुरात संताप व्यक्त केला जात आहे.
