समिरा फातिमा असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. ज्यावेळी पोलिसांनी फातिमाला अटक केली, तेव्हा ती आपल्या नवव्या नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फेमस असलेल्या सिव्हिल लाईन्स परिसरातील डॉलीच्या चहाच्या दुकानात चहा प्यायला आली होती. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. तिने विविध पुरुषांना फसवत किमान त्यांच्याकडून ४ ते ५ कोटी लुटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
पोलिसांनी फातिमाला अटक केल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. समीराने आतापर्यंत किमान आठ विवाहित पुरुषांना फसवले आहे. समीरा फातिमाविरुद्ध पहिली तक्रार मार्च २०२३ मध्ये दाखल करण्यात आली. तोपर्यंत तिने २०१० मध्ये इमरान अंसारी, २०१३ मध्ये नजमुज साकीब, रहेमान शेख, २०१६ मध्ये मिर्झा अशरफ बेग, २०१७मध्ये मुद्दसीर मोमीन, २०१९ मध्ये मोहम्मद तारीक अनीस, २०२२ अमानुल्लाह खान आणि २०२२ मध्ये गुलाम गौस पठाण यांच्याशी लग्न केले. यात एकाची माहिती उपलब्ध नाही.
तक्रारदार ट्रॅव्हल व्यावसायिक गुलाम गौस पठाणची तिची फेसबुकद्वारे भेट झाली. समीराने घटस्फोटित असल्याचे सांगून त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर ती सतत भांडणे, खोटे आरोप आणि धमक्या देऊन पैसे उकळू लागली. लाखो रुपये उकळल्यानंतर तिने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला. समझोत्याच्या नावाखाली मोठी रक्कम मागितली. अशाच प्रकारे तिने इतरही नवऱ्यांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आतापर्यंत तिने विविध पुरुषांकडून किमान ४ ते ५ कोटी लुटल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे फातिमा स्वतःला शिक्षिका म्हणवून घेत असे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. 'मी घटस्फोटित असून मला तुमचा सहवास हवा आहे' असे सांगून ती पुरुषांची सहानुभूती मिळवायची. कोणताही पुरूष सहमत झाला की, ती त्याच्याशी लग्न करायची. लग्नानंतर विविध कारणं सांगून ती पतीची आर्थिक लूट करायची.
