मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय दुर्गेश्वर ठाकूर याचे थडीसावळी येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यात संतापाची लाट उसळली. मंगळवारी दुपारी आरोपींनी दुर्गेश्वरला थडीसावळी गावात बोलावून घेतले. आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस? असा जाब विचारत नातेवाईकांनी त्याला घेरले.
अमानुष मारहाण अन् जागीच अंत
advertisement
वादाचे रूपांतर काही वेळातच मारहाणीत झाले. संतापलेल्या आरोपींनी दुर्गेश्वरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी त्याच्या गुप्तांगावर लाथा मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीतच दुर्गेश्वरला उलट्या सुरू झाल्या आणि काही क्षणांतच त्याने जागीच प्राण सोडले. एका तरुणाचा अशा प्रकारे भरदिवसा अंत झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी सात जणांना ठोकल्या बेड्या
घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत एकूण सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये थडीसावळी गावातील ३ आणि शेजारील तेलंगणा राज्यातील चार आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
अटक आरोपींची नावे
1) पद्मसिंह गंगा सिंह ठाकुर
2) राजू सिंग गंगा सिंग ठाकूर
3) गंगासिंग हनुमानसिंग ठाकूर सर्व रा थडी सावळी
4) दिलीप सिंह ठाकुर
5) विजय सिंग ठाकूर
6) विशाल सिंह ठाकूर
7) प्रताप सिंग ठाकूर
सर्व राहणार निर्मल तेलंगणा
गावात तणावपूर्ण शांतता
घटनेनंतर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "प्रेम प्रकरणातून झालेला हा खून अत्यंत दुर्दैवी असून, कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. या घटनेमुळे मुतन्याळ आणि थडीसावळी या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
