संजीवनी सुधाकर कमळे (१९) आणि लखन बालाजी भंडारे (१९) अशी मृतांची नावे आहेत. संजीवनी ही विवाहित असून लखन अविवाहित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी आणि लखन यांचे प्रेमसंबंध होते. सोमवारी लखन हा संजीवनीच्या घरी भेटायला गेला होता. यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी दोघांना आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले. त्यानंतर त्यांनी लखनला पकडून ठेवले आणि संजीवनीच्या वडिलांना, मारुती लक्ष्मण सुरणे यांना बोलावले.
advertisement
हातपाय बांधून विहिरीत फेकले
मुलीचं प्रेम प्रकरण समजल्यानंतर लक्ष्मण सुरणे तातडीने मुलीच्या सासरी आले. त्यांनी मुलीला अन् तिच्या प्रियकराला गोळेगाव येथून बोरजुन्नी गावाकडे नेले. वाटेत करकाळा शिवारात त्यांनी दोघांचेही हातपाय बांधले आणि त्यांना एका विहिरीत फेकून दिले. यानंतर आरोपी मारुती सुरणे याने स्वतःहून उमरी पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली.
तिघांना अटक
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. सायंकाळी संजीवनीचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला, तर लखनच्या मृतदेहाचा शोध सुरू होता. या प्रकरणी उमरी पोलिसांनी मारुती सुरणे, त्याचा भाऊ माधव सुरणे आणि वडील लक्ष्मण सुरणे यांना अटक केली आहे. उमरी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने पुढील तपास करत आहेत.