सक्षम ताटे याची 27 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणी आंचलचे वडील, दोन्ही भाऊ आणि अन्य तीन आरोपी अटक आहेत तर या प्रकरणातील दोघे आरोपी फरार आहेत. तिघेही आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.
२७ नोव्हेंबर रोजी सक्षमची हत्या करण्यात आल्यानंतर २८ नोव्हेंबरनंतर त्याचे पार्थिक घरी आणण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली होती. अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना आंचल मामिडवारने तिचा प्रियकर सक्षमच्या पार्थिवासोबत लग्न केलं. या दृष्याने सगळेच भावूक झाले होते. सक्षम आणि आंचल काही दिवसांमध्येच विवाह करणार होते. त्याआधीच सक्षमची हत्या करण्यात आली.
advertisement
आंचल-सक्षमचं प्रेम कसं जुळलं?
आंचल आणि सक्षम यांची ओळख ऑक्टोबर २०२२ मध्ये झाली होती. पहिल्या भेटीतच आम्ही एकमेकांकडे आकर्षित झाल्याचे आंचलने सांगितले. त्यानंतर आम्ही इन्स्टाग्रामवर एकमेकांना शोधलं आणि तिथे मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण केली. एक महिन्यातच आम्ही गंभीर नात्यात आलो. सक्षम दहावीपूर्वी शिक्षणासाठी लातूरमधील अहमदपूरमध्ये होता. तो इथं आल्यानंतर आम्ही एकमेकांना पाहिलं असल्याचे आंचलने सांगितले. दहावीनंतर आम्ही एकाच कोचिंग क्लासमध्ये होतो. त्यामुळे भेटीगाठी सोप्या होत्या. आमच्या घरात मुलीने प्रेमात पडणं एक पाप आहे, असं समजतात. सक्षम हा बौद्ध असल्याने आमच्या घरातील विरोधात होते, असेही आंचलने सांगितले. आम्हाला वेगळं करण्यासाठी घरातील लोकांनी खूप प्रयत्न केले. त्याच्या विरोधात खोटे गुन्हे देखील दाखल केल्याचे आंचलने सांगितले. मात्र, आम्ही त्यानंतरही एकमेकांची साथ सोडत नसल्याने मलाही घरात कोंडून ठेवले होते. अखेर माझ्या वडिलांनी, भावाने सक्षमची हत्या केली असल्याचे आंचलने सांगितले.
सक्षमच्या पार्थिवासोबत लग्न का?
आंचलने एका वृत्तपत्राशी बोलताना सगळ्या घटनेवर भाष्य केलं. सक्षम ताटेच्या पार्थिवासोबत लग्न का केलं, या प्रश्नावर बोलताना तिने सांगितले की, सक्षमला माझ्या घरातील लोकांनी मारलं असलं तरी आमचं प्रेम जिंकलं आहे. सक्षमसोबत यासाठीच लग्न केलं की मला आमच्या प्रेमाला विरोध करणाऱ्यांना, त्याच्या मारेकऱ्यांना जिंकू द्यायचं नव्हतं असे आंचलने सांगितले. हत्या प्रकरणातील आरोपी माझे कुटुंबीय यांना फाशीची शिक्षा सुनवा, अशी मागणी आंचलने केली.
