काय आहे प्रकरण?
परभणी शहरातून अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह नांदेड जिल्हयातील माळाकोळी जवळील एका तलावात आढळून आला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील परमेश्वर बोबडे हा मुलगा परभणी येथील निवासी शाळेत आहे. इयत्ता 9 वी मध्ये तो शिक्षण घेतो. 7 सप्टेंबर रोजी पेपर देऊन तो गुरुकुलकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याचे अपहरण केले. या प्रकरणी परभणीतील नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली. दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता त्या आरोपींनी गुन्हा कबूल करून मुलाचा मृतदेह लोहा तालुक्यातील माळाकोळी जवळील तलावात हात पाय बांधून फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. खंडणीसाठी आरोपींनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास परभणी पोलीस करत आहेत.
advertisement
वाचा - ते दोघेही हॉटेलमध्ये थांबले होते, सकाळी एकत्र संपवलं आयुष्य, संभाजीनगरमधील घटना
मोठ्या भावाच्या उधारीमुळे लहान्याने जीव गमावला
परभणीच्या पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील प्रकाश बोबडे यांच्या 14 वर्षीय लहान मुलाचे गुरुवारी दुपारी अपहरण करण्यात आले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या तपासात बालाजी चव्हाण आणि नरेश जाधव या 2 तरुणांची नावे समोर आली. दोन्ही आरोपी पसार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांनी शिताफीने अटक केली. या दोन तरुणांनी 14 वर्षीय बालकास त्याचा मोठा भाऊ पैसे देत नसल्याचा राग मनात ठेवला होता. या रागातून त्यांनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हात-पाय आणि तोंड बांधून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे नेले. त्याच ठिकाणी त्याला संपवलं आणि त्याचा मृतदेह टाकून पसार झाले असल्याची माहिती समोर आली.