24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. शिवाय रुग्ण गंभीर होते असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, महिन्यापूर्वी ठाण्यात अशी घटना घडून गेल्यानंतरही राज्याच्या आरोग्य खात्याला जाग आली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
ठाण्याच्या रुग्णालयात काय घडलं होतं?
ऑगस्ट महिन्यात कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी उपचाराअभावी मृत्यू झाल्याचं सांगत रुग्णांच्या नातेवाईकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. या घटनेवर स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संताप व्यक्त केला होता. या घटनेच्या दोनच दिवसांनंतर आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या 13 रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर चार रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे वृद्ध होते, त्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला होता.
वाचा - लेझर लाइटने डोळे गमावण्याची वेळ, 6 तरुणांच्या डोळ्यांना दिसेना; पाहा VIDEO
ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या निर्माणाचं काम सुरू आहे. त्यामुळं जिल्हा रुग्णालयाचा भार कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर टाकण्यात आला आहे. ठाण्यासह पालघर आणि अन्य जिल्ह्यातील नागरिक कळव्यातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढत असल्याने डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.