शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप अससेल्या अशोक खरात याच्यावर बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर विशेष पोलीस पथक अर्थात एसआयटीकडून गेल्या तीन दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या पोलीस तपासात अशोक खरात याची गुन्हा करण्याची मोडस ऑपरेंडी अर्थात गुन्हा करण्याची पद्धती समोर आली आहे. तसेच त्याचे राजकीय नेत्यांबरोबरचे संबंध कसे मजबूत झाले, हे देखील हळूहळू समोर येऊ लागले आहे. नाशिकच्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर न्यूज १८ मराठीला याविषयी अधिक माहिती दिली.
advertisement
खरातने पाळलेला २० फुटांचा नाग, इथेच सगळे राजकारणी फसले!
सिन्नरच्या मिरगावात महादेवाचे मंदिर बांधून भोंदूबाबा खरात प्रसिद्ध झाला. गेल्या अनेक वर्षांपासून तो ज्योतिष पाहायचे काम करायचा. कुणी मुलगा होत नाही म्हणून भोंदू अशोक खरात याच्याकडे यायचे. कुणी संसारातल्या अडचणी घेऊन यायचे, कुणाला राजकीय भविष्याची चिंता असायची तर कुणाला नोकरीत प्रमोशन हवे असायचे. अशा ना ना प्रकारच्या तक्रारी घेऊन भक्त मंडळी अशोक खरात याच्या दरबारात जमायचे. पौर्णिमा अमावस्येला खरात मोठी पूजा करीत असे. या दिवशी मात्र गर्भश्रीमंत भक्तांची मांदियाळी खरातच्या दरबारात जमत असे.
नाशिक दोष निवारणासाठी देशात प्रसिद्ध, हेच अशोक खरातने हेरलं अन् सुरू झाला नागाचा धावा!
नाशिक शहर हे अनेक प्रकारच्या दोष निवारणासाठी देशात प्रसिद्ध आहे. कालसर्प दोष, नारायण नागबळी आणि इतर धार्मिक विधींसाठी देशातील सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचा उल्लेख केला जातो. हेच हेरून त्याने भक्तांना मूर्खात काढण्यासाठी सर्प पूजा घालण्याचे सुरू केले. एकदा का दरबारात भक्त मंडळी जमली की अशोक खरात हा ध्यानात मग्न व्हायचा. पुढची काही मिनिटे तंत्र-मंत्र म्हणून थेट नागराजाचा धावा तो करीत असते. काही वेळात २० फुटांचा नाग त्याच्या आजूबाजूला यायचा. अशोक खरात याच्या विशिष्ट बोलण्यानंतर नाग फणा काढून डोलत असे. समोर भला मोठा नाग पाहून भक्त मंडळींची बोबडी वळत असे. अनेक जण तर भीतीने कोमात जाण्याचे प्रसंग ओढावले, असे सूत्र सांगतात. हे सगळे पाहून अनेक गर्भश्रीमंत भक्तांना त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा भास झाला. समोर पाहिलेले दृश्य भक्त मंडळी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगत. महाराजांच्या दिव्य शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि आयुष्यातल्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हीही एकदा बाबांकडे जाऊन या, असे ते एकमेकांना सांगत असत.
रिमोट कंट्रोल अशोक खरातच्या हातात, त्याच्या तालावर नाग डोलत होता...!
परंतु सध्या सुरू असलेल्या चौकशीत तो नागच खोटा असल्याचे कळते आहे. रिमोट कंट्रोलने नियंत्रित होणारा परदेशातून आणलेला नाग तो वापरत असे. रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असे. त्यामुळे त्याच्या तालावर नाग नाचत असे. त्याच्या याच खोट्या कृतीला भुलून राजकीय नेते आणि अधिकारी त्याच्या नादाला लागले. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे भविष्य पाहणाऱ्या कॅप्टनचे भविष्य मात्र सध्या अंधारात आहे.
