बिघडलेल्या गोंदणातून मिळाली प्रेरणा
रवी चव्हाण याने डिझायनिंग विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर याच क्षेत्रात त्याने काही वर्षे नोकरीही केली. मात्र, दुसर्याला मोठे करण्यासाठी आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा विचार त्याच्या मनात विचार घोळत होता. 'लोकल १८' शी बोलताना रवीने सांगितले की, "पूर्वी एका जत्रेत मी हातावर गोंदण करून घेतले होते. मात्र, ते खराब झाले आणि हातावर एक विद्रूप खूण कायमची राहिली. आपल्यासोबत जे झाले, ते इतरांसोबत होऊ नये, या विचाराने मी टॅटू आर्टिस्ट होण्याचे ठरवले." त्यानंतर टॅटू काढण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन रवीने या क्षेत्रात पाऊल टाकले.
advertisement
लॉकडाऊनचा फटका, पण जिद्द कायम
व्यवसाय सुरू केल्यानंतर रवीचा प्रवास सोपा नव्हता. त्याने स्टुडिओ थाटला, पण काही दिवसातच कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे भाड्याने घेतलेले दुकान बंद करण्याची वेळ त्याच्यावर आली. मात्र, रवीने हार मानली नाही. कोरोना काळ संपताच त्याने पुन्हा नव्या उमेदीने आणि जिद्दीने शून्यातून सुरुवात केली. सुरुवातीला संघर्ष करावा लागला, पण आज त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळत आहे.
परराज्यातूनही ग्राहकांची पसंती
आज रवीच्या हातातील कलेची जादू केवळ नाशिकपुरती मर्यादित राहिलेली नाही. नाशिक सोडून इतर जिल्ह्यांतूनही, शहरांतूनही आणि अगदी परराज्यातूनही अनेक ग्राहक खास त्याच्याकडे टॅटू काढण्यासाठी येतात. ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे आज हा तरुण महिन्याला लाखांच्या घरात कमाई करत आहे.
कोठे संपर्क साधाल?
सध्या नाशिकमधील 'तिबेटियन मार्केट' येथे रवीचे स्वत:चे शॉप आहे. तसेच सोशल मीडियावरही त्याची क्रेझ असून 'Tattoo Wala 2' या इन्स्टाग्राम पेजवर त्याच्या कलेचे अनेक नमुने पाहता येतात. टॅटूची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी या स्टुडिओला भेट द्यावी, असे आवाहन रवीने केले आहे.