एकीकडे प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना, दुसरीकडे हिंदू समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवत, अनधिकृत दर्गा परिसरात एकत्र जमायला सुरुवात केली आहे. मात्र कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हिंदू साधू महंतावर मोठी कारवाई केली असून आंदोलनात सहभागी होणाऱ्या आणि आंदोलनाला पाठबळ देणाऱ्या साधू महंतांची धरपकड सुरू केली आहे.
advertisement
याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी महंत सुधीर दास महाराज यांना ताब्यात घेतलं आहे. तर महंत अनिकेत शास्त्री महाराज पोलिसांच्या नजर कैदेत आहेत. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात 25 वर्षांपूर्वी हा दर्गा उभारण्यात आला आहे. तेव्हापासून हा दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात होता. अलीकडेच या मागणीने जोर धरला असून दर्ग्यावर कारवाई केली नाही, तर शनिवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. हे आंदोलन होण्याआधीच महापालिकेनं अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी अजूनही आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. यामुळे आंदोलनापूर्वी नाशिक पोलिसांकडून आंदोलन स्थळी येणाऱ्या साधू महंत आणि हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. नाशिकच्या याच काठेगल्ली द्वारका भागात आलेल्या काही आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
एकीकडे हिंदुत्ववादी संघटनांकडून या परिसरात असलेली दर्गा हटवण्याची मागणी केली जात असताना दुसरीकडे मात्र मुस्लीम धर्मगुरु मौलाना इब्राहीम यांनी मुस्लीम धर्मियांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दर्गा परिसरात अवतीभवती असलेलं अतिक्रमण काढले जात आहे. दर्गा पूर्णपणे काढली जाणार नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा प्रकारचं आवाहन मुस्लीम धर्मगुरुंनी मुस्लिम समुदायाला केलं आहे.
