पदांसाठीची ही चुरस आता उघडपणे दिसू लागली आहे. प्रत्येक इच्छुक स्वतःला सक्षम, अनुभवी आणि पक्षासाठी उपयुक्त असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असून, वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी, फोनाफोनी आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. काही नेते स्थानिक संघटनात्मक ताकद पुढे करत आहेत, तर काही जण वरिष्ठ पातळीवरील संपर्कावर भर देत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेणार
महापौर पदाबाबत विशेष उत्सुकता असून, या पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे इच्छुकांनी थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. या प्रक्रियेत शहराध्यक्षांवरही अप्रत्यक्ष दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षातील एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन वरिष्ठ नेत्यांकडून होत असले, तरी पदांसाठीची स्पर्धा वातावरण तापवणारी ठरत आहे.
दरम्यान, येत्या मंगळवारी (दि. २७) नाशिक महानगरपालिकेची गट नोंदणी प्रक्रिया विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती आहे. या प्रक्रियेनंतरच अधिकृतरीत्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, गट नोंदणीपूर्वीच इच्छुकांनी हालचाली सुरू केल्याने भाजपमधील अंतर्गत समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे स्पष्ट बहुमतामुळे भाजप सत्तास्थापनेसाठी मजबूत स्थितीत आहे, तर दुसरीकडे पदवाटपावरून होणारी रस्सीखेच पक्षासाठी आव्हान ठरू शकते. आगामी काही दिवसांत कोणाला कोणते पद मिळणार, यावरून नाशिकच्या राजकीय वर्तुळात निर्णायक हालचाली आणि कुरघोड्या पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
