राणी समाधान काळे असे नाशिकच्या मृत महिलेचे नाव आहे. नाशिकच्या घोटीत त्यांनी विषप्राषन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. राणी काळे यांचा विवाह डिसेंबर 2022 मध्ये घोटीतील समाधान काळे याच्यासोबत झाला होता. सुरुवातीला अपत्य होत नसल्याने सासरच्यांकडून विवाहित राणीचा छळ सुरू होता. अखेर तीन वर्षानंतर राणीला मुलगी झाली. सुरुवातीला अपत्य न होण्यावरून आणि नंतर मुलगी झाली या कारणांवरून राणीचा छळ सुरू होता. सासरच्या मंडळींकडून पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप देखील मुलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
advertisement
चौघेजण ताब्यात तर दोन जण फरार
या गुन्ह्यात पतीसह सासू, दीर आणि तीन जावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर घोटी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून उर्वरित दोघा आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी माहेरच्या मंडळींनी केली आहे.
ठोस उपाययोजना करण्याची गरज
राज्यामध्ये पुण्यातील वैष्णवी हगवणे, नाशिकची भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरण राज्यात बहुतांश दिवस चर्चेत राहिलंय, त्यानंतर आता नुकतेच मुंबईतील डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. कठोर कायदे करूनही सासरी होणारा त्रास कमी व्हायला तयार नाहीये. त्यात आता नाशिकच्या घोटीतील राणे काळे या महिलेच्याही आत्महत्येची भर पडलीये. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
गौरी गर्जेची आत्महत्या
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, अनंत गर्जे याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणं व्हायची. याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
