हेमंत वाजे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे सिन्नर नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार मानले जात होते. त्यांनी यापूर्वी सिन्नर नगराध्यक्ष आणि नगरसेवक गटनेता अशी महत्वाची पदे भूषवली असून स्थानिक राजकारणात त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. हेमंत वाजे यांना गळाला लावत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. सिन्नर नगरपरिषदेवर भाजपचा वर्चस्व निर्माण करण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
advertisement
माणिकराव कोकाटे यांचीही कोंडी होण्याची शक्यता
हेमंत वाजे यांच्या प्रवेशाने केवळ ठाकरे गटाचाच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का बसणार आहे. नगराध्यक्षपदासाठी हेमंत वाजे यांच्याएवढा प्रभावी आणि तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादीकडे सध्या नसल्याने त्यांच्या गोटातही संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचीही कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीची लढत अधिक चुरशीची
या घडामोडीनंतर सिन्नरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार असतानाच त्यांच्या घरातीलच व्यक्तीने भाजपचा झेंडा हाती घेणं, हे पक्षासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. हेमंत वाजे यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून, या कार्यक्रमाला गिरीश महाजन आणि स्थानिक भाजप नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतं. सिन्नरच्या या राजकीय हालचालीमुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होणार हे निश्चित.
