एकीकडे चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्र्याचं कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी माजी मंत्र्याच्या एका निकटवर्तीयाला उचललं आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
दीपक लोंढे असं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. आरोपी अशोक खरात याने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेहिशोबी माया जमवली आहेत. या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात दीपक लोंढे याने मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता पोलिसांनी चौकशीसाठी दीपक लोंढेला ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
advertisement
कोण आहे दीपक लोंढे?
दीपक लोंढे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अत्यंत सक्रिय एजंट आहेत. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी त्याचे अत्यंत जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे. अशोक खरात याच्याशी असलेल्या व्यावसायिक आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून लोंढे याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं.
SIT चौकशीचा रोख काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने जमवलेल्या अफाट मालमत्तेत आणि त्याच्या संशयास्पद जमिनींच्या व्यवहारात दीपक लोंढेचा काही सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. एसआयटीच्या पथकाने लोंढेची अनेक तास चौकशी केली. खरातच्या आर्थिक साम्राज्याबद्दल अनेक महत्त्वाचे प्रश्न त्याला विचारण्यात आले.
राजकीय आणि व्यावसायिक भागीदार रडारवर
दीपक लोंढे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आता पोलीस अशोक खरातच्या इतर राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खरातने 'न्युमरोलॉजिस्ट' बनून नाशिकमधील अनेक बड्या धेंडांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. यापैकी कोणाकोणाचे खरातसोबत आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत का? याचा तपास आता एसआयटी तयार करत आहे.
