नेमकं प्रकरण काय ?
संबंधित मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना साधारण २०१०-११ ची असावी. तेव्हा एक उमदा तरुण सिन्नर शहरातील शिवाजी चौकात व्यवसाय टाकून आपलं नशीब अजमावत होता. त्याने शेअर्स ट्रेडींगमधील कम्युनिटी मार्केटचं ऑफिस टाकलं होतं. व्यवसाय नवीन होता, शेअर मार्केटमधील अनिश्चितता यामुळे तरुणाला व्यवसायात जम बसवता येत नव्हता. याच काळात अशोक खरातचा एक चेला या तरुणाला भेटला. व्यवसायातील भरभराटीसाठी अशोक खरातला भेट, असा सल्ला त्याने दिला. काही वेळा दुर्लक्ष केल्यानंतर हा तरुण अशोक खरातला भेटायला तयार झाला.
advertisement
तो आपल्या मित्रासोबत नाशिकमधील अशोक खरातच्या ऑफिसला गेला. इंजिनिअरिंग झालेल्या या तरुणाने आपली सगळी कहाणी खरातला सांगितली. यशाचा मार्ग दाखवण्याची विनंती त्याने खरातकडे केली. त्यावेळी तरुणाच्या समोर टेबलवर नोटांनी भरलेला काचेचा बाऊल ठेवला होता. त्यात पैसे टाकावे लागतात, हे या तरुणाला माहीत नव्हतं. त्यामुळे तो बराच वेळ तसाच उभा राहिला. तरुणाकडून पैसे मिळत नसल्याचं बघून अशोक खरातने त्याला पुढची तारीख देत, तिथून कटवलं.
पण हा तरुण ठरलेल्या तारखेला पुन्हा खरातच्या ऑफिसमध्ये आला. यावेळी त्याच्या ऑफिसमध्ये चार- ते पाच इतर लोक होते. याकडे दुर्लक्ष करत हा तरुण थेट खरातच्या केबिनमध्ये घुसला. हा प्रकार पाहून खरात चिडला. पण आपणच आपल्याला बोलवलं असल्याची आठवण या तरुणाने करून दिली. यावेळी चिडलेल्या खरातने 'तुझं काही होणार नाही, तू सिन्नर सोडून पळून जा' असा अजब सल्ला दिला.
हा सल्ला ऐकून उच्चशिक्षित असलेला हा तरुणही चिडला. त्याने अशोक खरातला प्रतिप्रश्न केला. मी का पळून जाऊ, असं त्याने विचारलं. यावर खरातचा आणखी पारा चढला. त्याने तुला अक्कल नाही. तू इथून बाहेर निघ, अशा शब्दात सुनावलं. यावर तरुणाने देखील खरातची खरडपट्टी काढायला सुरुवात केली. मी इंजिनिअरींग केलंय. कुठेही दोन पैसे कमवेल, पळून जाण्याचा सल्ला देऊ नका, अशा शब्दात त्याने सुनावलं.
हा प्रकार बघून खरातने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने तरुणाला ढकला ढकली करत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने तोंडाचा पट्टा सुरू करत 'अशोक खरात भामटा आहे, याच्या नादी लागू नका, काहीही सल्ला देतो' असं ओरडून बोलायला सुरुवात केली. यानंतर हा तरुण इथून गेला. मात्र त्याने सिन्नर सोडलं नाही. त्याने काही छोटे मोठे व्यवसाय केले. काही मध्ये यश मिळालं तर काहीमध्ये अपयश आलं. पण सध्या हाच तरुण सिन्नरचा नगरसेवक आहे. त्याने २०१० ला भोंदूबाबाचा सल्ला ऐकला असता तर तो कदाचित आता नगरसेवक नसता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
