नाशिक - नाशिक शहर हे आता मिसळसाठी सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे, हे आपल्या माहिती आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हे नाशिकमध्ये आल्यावर मिसळ चाखण्यासाठी उत्सुकता असतात. नाशिकबद्दल बोलायचे झाल्यास, आता शेकडो मिसळ स्पॉट बनलेले आहेत. त्यातीलच एक मामाचा मळा हे ठिकाण आता नाशिकमधील प्रसिद्ध मिसळ सेंटर बनले आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
मामाचा मळा या ठिकाणी संपूर्ण परिसर हा ग्राहकांना निसर्गरम्य वातावरणात मिसळ खाण्यासाठी बनविला गेला आहे. दिग्विजय मानकर यांनी मामाची मिसळ ही संकल्पना 2015 मध्ये सुरू केली. त्यांचे म्हणणे असे आहे की, आताची तरुण पिढी ही शेतात राबणाऱ्या आणि शेतकऱ्यांना फक्त पुस्तकामुळेच ओळखत असते. शेतीविषयक त्यांना कुठल्याच प्रकारचे ज्ञान नाही. त्याकरता फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर त्यांना डोळ्यानेही हे सर्व बघता यावे, या उद्देशाने हा परिसर तयार करण्यात आला आहे.
आपण लहानपणी मामाच्या गावी जायचो. परंतु आता कोणीही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मामाकडे न जाता मोबाईलमध्ये अडकलेले असतात. त्यामुळे मामाच्या गावी जाण्याची आवड निर्माण होईल, यासाठी त्याच पद्धतीने आम्ही देखील मामाची मिसळ म्हणून हे मिसळ केंद्र चालू केल्याचेही त्यांनी सांगितले.
या ठिकाणी ग्राहकांना मराठी संस्कृतीप्रमाणे चौरंगावर बसून ही मिसळ खाण्याचा अनुभव मिळतो. या ठिकाणी ही मिसळ चुलीवर तयार केली जाते. 100 रुपये प्लेट अशी या मिसळची किंमत आहे. तसेच सर्वसामान्यांना परवडणारी अशी ही मिसळ आहे. तसेच या ठिकाणी मिसळ भाकरी देखील उत्तम मिळते. त्यातल्या त्यात नव्या पिढीला शेताची आवड या ठिकाणी मिसळ खाताना होत असते, असे ते म्हणाले.
दिग्विजय मानकर यांनी या परिसरात अनेक झाडे लावली आहेत. यामुळे नाशिककर या ठिकाणी आपल्याला लहान मुलांना घेऊन मोठ्या संख्येने मिसळ खाण्यासाठी येतात. खाण्यासोबत मुलांना ज्ञानही मिळते. यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने खवय्ये गर्दी करतात.
त्यांच्या उत्पन्नाबाबत बोलायचे झाल्यास या व्यवसायातून त्यांना महिन्याला 15 ते 16 लाख रुपयांचे उत्पन्न होते. शनिवारी आणि रविवारी याठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. मखमलाबाद गावाजवळून अगदी काही अंतरावरच ही मिसळ मिळते. तुम्हालाही याठिकाणचा आनंद घ्यायचा असेल, येथील मिसळची चव चाखायची असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.