नेमकी घटना काय?
बुधवारी सकाळी 10:15 च्या सुमारास मोहदरी घाटात हा थरार घडला. सिन्नरकडून नाशिककडे जाणारा कंटेनर (MH 46 AR 2725) चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून थेट विरुद्ध लेनवर (नाशिक ते सिन्नर मार्ग) जाऊन उलटला. त्याच वेळी नाशिककडून सिन्नरकडे जाणारी महिंद्रा पिकअप (MH 15 GV 7149) आणि एक दुचाकी (MH 15 CB 6796) या कंटेनरच्या भीषण तडाख्यात सापडल्या. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि पिकअप दोन्ही वाहने उलटली, तर दुचाकीस्वार कंटेनरखाली चिरडले गेले.
advertisement
शाळेला जाताना शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, पुलावरून उडून थेट रस्त्यावर, मुलाचा आक्रोश, गाव हळहळलं
अपघातातील मृतांची नावे
- बाळासाहेब बाजीराव व्यापारी (वय 42): नाशिक येथील भाजीपाला व्यापारी (मूळ रा. केलवड, राहाता).
- अवधूत रामनाथ निर्मळ (वय 23): आयटी अभियंता (रा. पिंप्री निर्मळ, राहाता).
- शाजी फर्नांडो (वय 50): दुचाकीस्वार (रा. उपनगर, नाशिक).
आई-वडिलांचा एकुलता एक आधार हरपला
या अपघातातील सर्वात चटका लावणारी गोष्ट म्हणजे 23 वर्षीय अवधूत निर्मळ याचा मृत्यू. अवधूतची नुकतीच मुंबईतील एका नामांकित कंपनीत 'आयटी इंजिनिअर' म्हणून निवड झाली होती. तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सुट्टीसाठी नाशिकला आला असताना आपल्या नातेवाईकांच्या (बाळासाहेब व्यापारी) पिकअपमधून तो गावी जात होता. मात्र, घरापर्यंत पोहोचण्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली.
मोहदरी घाटात यापूर्वीच एका किरकोळ अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती, ती सोडवण्यासाठी पोलीस तिथे उपस्थित होते. अपघात होताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना सिन्नरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
फरार चालकावर गुन्हा दाखल
अपघातानंतर माणुसकी विसरून कंटेनर चालक मदतीऐवजी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे.
'अपघाताचा घाट' कधी थांबणार?
मोहदरी घाटात जड वाहनांचा वाढलेला वेग, चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक आणि तांत्रिक त्रुटी यामुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या ठिकाणी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.






