‘निओ मेट्रो’चा प्रवास थांबला, पण आशा कायम
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये नाशिकसाठी देशातील पहिल्या 'निओ मेट्रो'ची घोषणा केली होती. 2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी 2100 कोटींची तरतूदही झाली. मात्र, 2024 ची डेडलाईन उलटूनही हा प्रकल्प कागदावरच राहिला. केंद्र सरकारने अखेर निओ मेट्रोला 'अव्यवहार्य' ठरवत लाल कंदील दाखवला. यामुळे नाशिकची मेट्रो रखडणार असे वाटत असतानाच, महामेट्रोने नियमित मेट्रोचा पर्याय समोर आणला आहे.
advertisement
ST प्रवासात सवलत हवीये? NCMC कार्ड काढलंत का? महामंडळाचा मोठा निर्णय, कुणाला फायदा?
महामेट्रोचा नवा प्लॅन: काय घडणार बैठकीत?
नाशिक शहराची वाढती लोकसंख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची गरज ओळखून महामेट्रोने 'एकात्मिक वाहतूक विकास आराखडा' तयार केला आहे. या आराखड्यानुसार नाशिकमध्ये नियमित मेट्रो प्रकल्प राबवणे शक्य असल्याचे महामेट्रोचे म्हणणे आहे. महामेट्रोने सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि नवीन मार्गिकेचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी महापालिकेने सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, उद्योजक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी सूचना महामेट्रोने केली आहे.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुहूर्त
महामेट्रोने नाशिक महापालिकेला स्मरणपत्र पाठवले असून, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ही महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या भविष्यातील वाहतूक कोंडीवर मेट्रो हाच एकमेव प्रभावी उपाय ठरू शकतो. केंद्र व राज्य सरकारशी समन्वय साधून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
कुंभमेळ्यापूर्वी निर्णयाची अपेक्षा
2027 च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. निओ मेट्रोचा पर्याय संपल्याने आता 'नियमित मेट्रो'ला गती मिळते का, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे. पुढील आठवड्यात होणारी ही बैठक नाशिकच्या दळणवळणाच्या नकाशात मोठा बदल घडवणारी ठरू शकते.






