सोशल मीडियावर अफवा पसरल्यानंतर रात्री 8 वाजेनंतर नाशिक शहर आणि परिसरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतकरी देखील ट्रॅक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी मोठ्या रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, ही सर्व परिस्थिती केवळ अफवांमुळे निर्माण झाली असून जिल्ह्यात इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
advertisement
सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये घबराट
इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशांतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला आहे हे सत्य असले तरी केंद्र सरकारने देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
विनाकारण गर्दी करू नये
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल पंप चालक मालक संघटनेनेही स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. पेट्रोल पंप बंद राहण्याचे कोणतेही आदेश नाहीत. नागरिकांनी गरजेपुरतेच इंधन भरावे, विनाकारण गर्दी करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये.
