advertisement

शिकारीचे हत्यार तयार करणारे हात जेव्हा हार्मोनियम, तबला तयार करू लागले, मिरजकर म्युझिकल्सची कहाणी

Last Updated:

या परंपरेला जपणाऱ्या काही मोजक्या कुटुंबांमध्ये मिरजकर कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते. मिरजकर कुटुंबाची मिरजकर म्युझिकल्स ही परंपरा 1950 पासून पुण्यात संगीत क्षेत्रात विशेष ओळख निर्माण करत आहे.

+
News18

News18

पुणे : शहराची सांस्कृतिक ओळख सांगताना शास्त्रीय संगीत आणि वाद्यनिर्मितीची परंपरा विशेषत्वाने अधोरेखित केली जाते. या परंपरेला जपणाऱ्या काही मोजक्या कुटुंबांमध्ये मिरजकर कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते. मिरजकर कुटुंबाची मिरजकर म्युझिकल्स ही परंपरा 1950 पासून पुण्यात संगीत क्षेत्रात विशेष ओळख निर्माण करत आहे. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या वाद्यनिर्मितीच्या कौशल्यामुळे या कुटुंबाने शास्त्रीय संगीताशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आहे.
मिरजकर घराण्याची मूळ परंपरा विजापूरच्या आदिलशाही काळाशी जोडलेली आहे. त्या काळात त्यांच्या पूर्वजांना शिकलगार म्हणून ओळखले जात असे. शिकलगार म्हणजे शस्त्रे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि धार लावणे अशी कामे करणारे कारागीर. एका प्रसंगी विजापूरच्या सरदारांच्या कामासाठी त्यांना मिरज येथे बोलावण्यात आले. स्थानिकांना जमत नसलेले काम त्यांनी कौशल्याने पूर्ण केले. त्यांच्या या कामगिरीवर खूश होऊन त्यांना मिरज येथे जमीन इनाम म्हणून देण्यात आली आणि तेथूनच मिरजकर घराणे मिरजमध्ये स्थायिक झाले.
advertisement
या घराण्यात वाद्यनिर्मितीची परंपरा सुरू झाली ती 1827 साली जन्मलेल्या फरीदसाहेबांपासून. त्यांच्या लहानपणीच पित्याचे छत्र हरपले होते. त्यामुळे त्यांचे संगोपन मोठे भाऊ मोहद्दीन यांनी केले. सुरुवातीला हे दोघे भाऊ इतर शिकलगारांप्रमाणे हत्यारे तयार करण्याचे काम करत होते. मात्र ब्रिटिशांच्या काळात लढाया कमी झाल्याने हत्यारांची गरजही कमी झाली. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांनी घरगुती कामांसाठी लागणारी छोटी साधने तयार करण्यास सुरुवात केली.
advertisement
याच काळात काही लोकांच्या मागणीनुसार मोहद्दीनसाहेब आणि फरीदसाहेब यांनी सारंगीचे खोके, तुणतुणे आणि इतर वाद्यांचे भाग तयार करण्यास सुरुवात केली. फरीदसाहेबांना या कामात विशेष रस वाटू लागला. मिरजेच्या दरबारात त्या वेळी अनेक कलावंत येत असत. गंगाधर ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन हे त्या काळचे रसिक आणि दानशूर शासक होते. त्यांच्या दरबारात होणाऱ्या संगीत मैफिलींना उपस्थित राहून फरीदसाहेब कलाकारांशी संवाद साधत आणि त्यांच्या वाद्यांमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा समजून घेत.
advertisement
त्या काळात महाराष्ट्रात वाद्यनिर्मिती फारशी होत नव्हती. बहुतेक वाद्ये जयपूर, बनारस किंवा कोलकाता येथून मागवावी लागत असत. वाहतूक व्यवस्था मर्यादित असल्याने वाद्यांची दुरुस्ती किंवा नवीन वाद्य मिळवणे हे खर्चीक आणि वेळखाऊ काम होते. अशा वेळी फरीदसाहेबांसारखा कुशल कारागीर कलाकारांसाठी मोठा आधार ठरला. हळूहळू त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळू लागली.
सुमारे 1850 च्या सुमारास त्यांनी पहिला तंबोरा तयार केला, असे सांगितले जाते. त्यानंतर वाद्यनिर्मितीचा प्रवास अधिक वेगाने सुरू झाला. मिरज शहराला संगीताचे माहेरघर म्हणून ओळख मिळण्यातही अशा कारागिरांचा मोठा वाटा आहे. पुढे चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात कोल्हापूरमध्ये असलेल्या प्रभात स्टुडिओमध्येही या कुटुंबातील सदस्यांनी वाद्यनिर्मिती आणि दुरुस्तीचे काम केले. नंतर हा स्टुडिओ पुण्यात हलवल्यानंतर मिरजकर कुटुंबही पुण्यात आले.
advertisement
पुण्यात आल्यावर तुळशीबाग परिसरात मिरजकर म्युझिकल्स या नावाने दुकान सुरू करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत आठ पिढ्या ही परंपरा जपत आहेत. सध्या या व्यवसायात तंतुवाद्य, हार्मोनियम, तबला यांसह विविध शास्त्रीय वाद्यांची निर्मिती आणि दुरुस्ती केली जाते. वाढत्या संगीतप्रेमींच्या संख्येमुळे या वाद्यांची मागणीही वाढत आहे.
आज या संस्थेच्या दोन शाखा असून सुमारे बारा जण या कामात कार्यरत आहेत. वार्षिक उलाढाल सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या परंपरेला पुढे नेण्यासाठी आणि संगीताविषयी आवड असणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण देण्याचीही तयारी असल्याचे साजिद मिरजकर यांनी सांगितले. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल राखत ‘मिरजकर म्युझिकल्स’ पुण्यातील संगीत संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम आजही सातत्याने करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
शिकारीचे हत्यार तयार करणारे हात जेव्हा हार्मोनियम, तबला तयार करू लागले, मिरजकर म्युझिकल्सची कहाणी
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement