बसेसला नाशिकमध्ये नो एन्ट्री
वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी नाशिक शहरातील सर्व खासगी बसेसचे बसस्टॉप्स, त्यांचे पिकअप- ड्रॉप सेंटर आणि सर्व पार्किंग सुद्धा रद्द करण्यात आली आहेत. प्रायव्हेट बसेसलाच नाशिकमध्ये 'नो एन्ट्री' करण्यात आली आहे. परंतू, नाशिक जिल्ह्यामध्ये सेवा पुरवणाऱ्या सिटी लिंक बसेसला कोणतेही निर्बंध नाहीत. तपोवनमध्ये असलेल्या सिटीलिंक बस टर्मिनलवरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांना नाशिकमध्ये प्रवास करणं सोयीचं होईल. वाहतूक पोलीस उपायुक्तांनी शहरातील प्रवेश बंदीमध्ये वाढ केलेली आहे. 31 मे 2026 पर्यंत या अधिसूचनेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता आहे.
advertisement
शहरातल्या प्रवेशबंदीमध्ये वाढ
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त द्वारका सिग्नल- सारडा सर्कल- काठे गल्लीपर्यंत 'ग्रेड सेप्रेटर'चे काम सुरू असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. यामुळे वाहतूकदारांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. चार चाकी वाहनांना आणि दुचाकी वाहनांना मुंबई नाका आणि टाकळीच्या मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जानेवारी 2026 पासून सर्व खासगी बसेसचे बसस्टॉप रद्द करण्याबाबत आणि शहरात प्रवेशबंदी लागू करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. आता त्यात वाढ करून 31 मे 2026 पर्यंत ही अधिसूचना लागू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकासकामांमुळे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी नाशिककरांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सध्या शहरातील 29 रस्त्यांचे आणि 5 उड्डाणपुलाचे दुरुस्ती आणि खोदकामाचे काम सुरू आहे. शहरातील गजबजलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांना वाहतूक विभागाने लादलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी दिली.
