नाशिक शहरासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीवर महापालिकेकडून 25 कोटी खर्चुन 'राम झुला' हा पादचारी पुल उभारला जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेकडून बालाजी कोट ते गणेशवाडी या परिसरामध्ये हा पुल उभारला जाणार आहे. खरंतर हा पुल भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा मुद्दा ठरणार असून नाशिककरांच्याही दृष्टीने हा पुल महत्त्वाचा ठरणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येतो. पुरामुळे या गोदावरी घाट परिसरातला रामसेतू बऱ्याचदा पाण्याखाली जातो. धरणातून पाणी सोडल्यामुळे रामकुंडावरील पाण्याच्या पातळीत वाढ होते. यामुळे अनेक कामांना अडथळा निर्माण होतो.
advertisement
या सर्व दृष्टीने 'राम झुला' हा पादचारी पुल नाशिककरांसाठी उभारला जात आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा पुल उभारला जाणार असून ब्लू फ्लड लेव्हलपेक्षा अधिक उंचीवर पूल उभारला जाणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि पूर परिस्थितीतही पुलाचा वापर करता येईल, असा हा पुल उभारला जाणार आहे. जुन्या नाशिकमधील बालाजी कोट ते गणेशवाडी भाजीबाजार परिसराला हा पूल जोडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपूर्ण नाशिकचाच कायापालट केला जाणार आहे. महापालिका प्रशासन, आमदार आणि खासदार या सर्वांकडूनच नाशिकचा कायापालट केला जातोय.
पुलामुळे पादचाऱ्यांना आणि वाहतुकदारांना खूपच फायदा होणार असून नाशिकला पुन्हा एकदा 'राम झुला' पादचारी पुलामुळे सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. शिवाय, भविष्यात हा पूल शहराचा नवा लँडमार्क सुद्धा होणार असल्याची माहितीही आमदारांनी दिली. या पुलाचा विशेष फायदा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना विशेष होणार आहे. शिवाय पर्यटकांनाही या पुलावरून घाट परिसर खूप व्यवस्थित पाहायला मिळणार आहे. बालाजी मंदिर, रामकुंड, काळाराम मंदिर, मेन रोड, सराफ बाजार, तपोवन आणि गणेशवाडी बाजार हे भाग एकमेकांशी जोडले जाणार आहे.
