ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा आता एक नवा कारनामा समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर तांत्रिक उपकरणांचा वापर करून अघोरी उपचार करत असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा हा अत्यंत गंभीर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
'इंटरनेट केबल टेस्टर'ने अघोरी उपचार
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अशोक खरात एका अल्पवयीन मुलीला टी शर्ट वर करायला सांगत आहे. पोटावर 'इंटरनेट केबल टूल' आणि 'केबल टेस्टर' यासारख्या उपकरणांचा वापर करताना तो दिसत आहे. हे विकृत आरोपी मुलीच्या आईसमोरच केबिनमध्ये बसून करताना दिसत आहे. उपचाराच्या नावाखाली तो त्या मुलीवर अघोरी क्रिया करत असल्याचा बनाव रचत असल्याचं या व्हिडिओतून उघड झालं आहे. आता हा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्ह्याची शक्यता
यापूर्वीच खरातवर बलात्कार, लैंगिक छळ आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आता हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्या'नुसार (अंधश्रद्धा निर्मूलन कायदा) अतिरिक्त गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
SIT कडून सखोल तपास सुरू
पोलीस उपआयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) खरातच्या कार्यालयातील जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत असे अनेक अघोरी प्रकार समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातने अशा प्रकारे अजून किती जणांची फसवणूक केली आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
