आज पहिल्याच दिवशी सुमारे ४ हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता २ कोटी इतकी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहणार असून, दररोज २३ नियोजित उड्डाणे सुरू राहणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) कार्यान्वित झाल्यामुळे आता कोकणवासीयांचा विमानप्रवास अधिक सुखकर आणि जवळचा होणार आहे. विशेषतः अलिबाग, पेण आणि संपूर्ण कोकण पट्ट्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळ प्रशासनाने एक अधिकृत 'रोड मॅप' जारी केला आहे. हा मार्ग वापरल्यास प्रवासी कोणत्याही गोंधळाशिवाय थेट विमानतळाच्या 'टर्मिनल १' ला पोहोचू शकणार आहेत.
advertisement
अलिबाग, पेण किंवा कोकणातून येणाऱ्या प्रवाशांनी सुरुवातीला अलिबाग-पेण रोड (NH66) पकडावा. हा मार्ग थेट पळस्पे फाटा - पनवेलच्या दिशेने जातो. पळस्पे फाट्यावर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी डाव्या बाजूला वळून राष्ट्रीय महामार्ग ३४८ धरावा. हा रस्ता तुम्हाला गव्हाण फाट्याच्या दिशेने घेऊन जाईल.एकदा तुम्ही गव्हाण फाटा इंटरचेंजला पोहोचलात की, तेथून उजव्या बाजूच्या 'टर्निंग लूप'चा वापर करून आमरा मार्ग वर चढावे. हा मार्ग थेट विमानतळाकडे जातो.
आमरा मार्गावर आल्यानंतर प्रवाशांनी आपल्या गाडीच्या डाव्या लेनमध्ये राहावे. जोपर्यंत तुम्हाला विमानतळाच्या 'वेस्टर्न मेन एन्ट्रन्स'च्या (Western Main Entrance) डाव्या बाजूला असलेला U-टर्न रॅम्प दिसत नाही, तोपर्यंत सरळ पुढे जावे. या U-टर्न रॅम्पवरून वळण घेतल्यावर तुम्ही विमानतळाच्या मुख्य प्रवेश रस्त्यावर प्रवेश कराल. हा प्रशस्त रस्ता तुम्हाला थेट विमानतळाच्या 'टर्मिनल १' कडे घेऊन जाईल.
कोकणातून मुंबई विमानतळावर जाण्यासाठी होणारा वाहतूक कोंडीचा त्रास आता या नवीन मार्गामुळे कमी होणार आहे. प्रवाशांनी गव्हाण फाटा आणि आमरा मार्गावरील दिशादर्शक फलकांकडे लक्ष द्यावे, जेणेकरून वळण घेताना कोणतीही चूक होणार नाही. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या या स्पष्ट मार्गदर्शिकेमुळे आता कोकण, अलिबाग आणि पेणमधील पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना वेळेवर विमानतळ गाठणे शक्य होणार आहे.
