TRENDING:

Navi Mumbai News: रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?

Last Updated:

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेने हार्बर रेल्वेच्या सुरक्षेवर आणि आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

advertisement
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी, नवी मुंबई: खांदेश्वर दरम्यान धावत्या लोकलमधून तरुणीला ढकलून देण्याची घटना ताजी असतानाच, नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेने हार्बर रेल्वेच्या सुरक्षेवर आणि आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीएसएमटी–पनवेल लोकलमधून प्रवास करत असताना २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मात्र, रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेलेला असल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रेल्वेत अथवा स्थानकात एखाद्या प्रवाशाबाबत वैद्यकीय आपात्कालीन घटना घडल्यास तातडीने उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिका स्थानक परिसरात असतात. मात्र, त्यांच्या कार्यक्षमतेबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत.
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
advertisement

हर्ष पटेल असे मृत तरुणाचे नाव असून तो २ डिसेंबर रोजी दुपारी १.३७ वाजता चेंबूर येथून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढला होता. प्रवासादरम्यान अचानक तो बेशुद्ध पडला. त्यानंतर सहप्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर संपर्क साधला. लोकल वाशी स्थानकात पोहोचताच जीआरपी कर्मचाऱ्यांनी त्याला १०८ रुग्णवाहिकेत हलवले. मात्र, त्या वेळी रुग्णवाहिकेचा चालक उपस्थित नसल्याचे समोर आले. चालक अनुपस्थित असल्याने तरुणाला तातडीने रुग्णालयात नेणे शक्य झाले नाही. अखेर प्रवासी आणि जीआरपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या जीपमधून वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

advertisement

जीआरपीने काय सांगितले?

“मृत्यूचे कारण तीव्र हृदयविकाराचा झटका आहे. रुग्णवाहिकेचा चालक २४ तास उपलब्ध असणे अपेक्षित असताना कोणताही पर्याय न ठेवता वाहन सोडून जाणे हे गंभीर निष्काळजीपणाचे आहे,” अशी माहिती वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली. मृत तरुणाला पूर्वीपासून काही आरोग्यविषयक तक्रारी होत्या, असेही त्यांनी सांगितले.

कुटुंबाचे गंभीर आरोप...

advertisement

दरम्यान, हर्षची बहीण अमिका पटेल हिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वाशी स्थानकात स्ट्रेचर, व्हीलचेअर, प्राथमिक उपचार साहित्य तसेच सीपीआर देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याचा दावा तिने केला. रुग्णवाहिकेचा चालक अनुपस्थित असल्यामुळे ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळेच भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिने केला आहे.

advertisement

तिने पुढं म्हटले की, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये माझा भाऊ पूर्णपणे ठणठणीत अवस्थेत ट्रेनमध्ये चढताना दिसतो. तो रोजप्रमाणेच प्रवास करत होता,” असे अमिकाने सांगितले. ट्रेन वाशी स्थानकात सुमारे १.५७ वाजता पोहोचली. माहिती मिळताच कुटुंबीय स्थानकात दाखल झाले. मात्र, कोणतीही तातडीची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या मदतीने कपड्याचा वापर करून त्याला सबवेमधून उचलून नेण्यात आले, असेही तिने नमूद केले.

advertisement

“स्थानकाबाहेर १०८ रुग्णवाहिका उभी होती, मात्र चालक नव्हता. सुमारे २.१० वाजेपर्यंत आम्ही वाट पाहत राहिलो. ती काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची होती,” असे सांगत अखेर पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरावा लागल्याचे तिने स्पष्ट केले. वाशी जीआरपी चौकीत लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती स्वीकारण्यात आली नाही आणि थेट सीएसएमटी येथील डीआरएम कार्यालयात जाण्यास सांगण्यात आल्याचा दावाही तिने केला आहे. कुटुंबीयांनी डीआरएम कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी गेली, 2 भावांनी सुरू केला अंडा रोल व्यवसाय, महिन्याची उलाढाल आता लाखात
सर्व पहा

पनवेल–खांदेश्वर दरम्यान लोकलमधून तरुणीला ढकलण्याची घटना आणि वाशी स्थानकात वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू, या सलग घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत रेल्वे प्रशासन कितपत सज्ज आहे, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai News: रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल