सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली पण त्यांची अपील फेटाळण्यात आली. पण, 'मी आता वरच्या न्यायालयात जाईल, पण तर तिथेही न्याय मिळाला नाहीतर मग परमेश्वराचा दरबार आहेच, पुढच्या निवडणुकीत नाही १७ उमेदवारांचं पॅनल लावलं तर नाव लावणार नाही' असं म्हणत उज्वला थिटे यांनी नवी गर्जना केली.
advertisement
सोलापूर अनगर नगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुरस्कृत उमेदवार उज्वला थिटे यांचा नराध्याक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात उज्वला थिटे यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे थिटे यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर थिटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'निकालीची प्रत हातात आली नाही. ती उद्याकडे येणार आहे. ती प्रत एकदा तपासून पाहणार आहे. पुढे उच्च न्यायालयात याचिका दाखल करता आली तर करणार आहे. जर उच्च न्यायालय नाही म्हणाले तर सुप्रीम कोर्टात जाईल' असं थिटे यांनी स्पष्ट केलं.
तसंच, ' जर सुप्रीम कोर्टात अपयश आलं तरी खचणार नाही. शेवटी परमेश्वराचा दरबार आहे, तरीही आम्ही मायलेक 2029 पर्यंत जगलो जीव राहिला, २०२९ किंवा २०३० ची निवडणूक असेल. आता जे १७ जण बिनविरोध निवडून आले म्हणताय ना, त्यावेळेस १७ च्या १७ पॅनल उज्वला थिटेनं नाही लावलं तर बघा' अशी गर्जना करत थिटे यांनी विरोधकांना चॅलेंज दिलं. यावेळी उज्वला थिटे यांचे डोळे पाणावले होते.
'अनगर नगरपंचायत निवडणुकीत अर्ज भरला त्यावेळेसच मी जिंकले. नगराध्यक्षपद जे बिनविरोध निवडून आलेले आहे, ते माझ्यामुळे झाले आहेत. पण त्यांचं अभिनंदन. प्राजक्ता पाटील यांचं अभिनंदन असणार आहे मात्र त्यांनी 2029 ला निवडणुकीसाठी तयार राहावं. 2029 साली जर सर्वसाधारण पुरुष गटाला आरक्षण पडलं तर राजन पाटील यांच्या विरोधात माझा मुलगा उभा राहणार आहे, असंही यावेळी थिटे म्हणाल्या.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी उज्वला थिटे यांच्या कोर्टाच्या कामकाजामध्ये चांगली साथ दिली. संविधान दिना दिवशी परंपरा जिंकली आणि लोकशाही हरली. जनतेच्या न्यायालयात आमचा संघर्ष सुरूच राहणार, असं उमेश पाटील यावेळी म्हणाले.
उज्वला थिटेंचा अर्ज का बाद झाला?
बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सुचकाची सही नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज बाद केला होता. नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर जिल्हा न्यायालयात उज्वला थिटे यांनी अपील केली होती.
