राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत विचारलं असता अमोल मिटकरी यांनी दहा जूनपर्यंत वाट बघावी, असं वक्तव्य केलं आहे. तसेच पांडुरंगाची इच्छा असेल, तर लवकरच ताई-दादा एकत्र येतील, असंही मिटकरींनी म्हटलं आहे. मिटकरींच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, अशा शक्यता वर्तवल्या जातायत. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसेल, असं वक्तव्य केलंय. यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत नेमकं काय शिजतंय, याबाबत संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.
advertisement
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले, "पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत ताई दादा एकत्र येतील. अजून तसा काही प्रस्ताव आल्याचं कळलं नाही. पण दहा तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय. त्यामुळे दहा तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. दोघांनी एकत्र येण्यासाठी कुणाचा विरोध असण्याचं काहीही कारण नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. पवारसाहेब, दादा आम्हाला जो काही आदेश देतील, तो आदेश अंतिम मानून आम्ही पुढे जाऊ. पांडुरंगाच्या मनात जे असेल तेच होईल. आषाढी एकादशीचा कशाला, कुठलाही मुहूर्त असू शकतो, पण तूर्तास तसा प्रस्ताव नाही."
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या कामाची पद्धत आपण सगळ्यांनी सहा दशकांपासून पाहिली आहे. पवारसाहेब जो काही निर्णय घेतात, जे काही मार्गदर्शन करतात. ते लोकशाही पद्धतीनेच होत असतं. त्यामुळे जो काही निर्णय असेल, तो शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. एका बाजुने आम्ही आजपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही आणि घेणारही नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.