बीड : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे ही सगळी चर्चा सुरु झाली होती. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय प्रक्रिया किंवा धोरण ठरवण्यात सहभागी होत नाही, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे आता आमच्या गटाला अजित पवारांसोबत जायचे असेल तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे सांगत पवारांनी सर्व सूत्रं नव्या पिढीच्या हाती सोपवली होती. तेव्हापासूनच अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान या चर्चा होत असताना बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील दोन्ही गट एकत्र येण्याच्या वक्तव्यास हिरवा कंदिल दिला आहे. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र झाले तरी आम्हाला दु:ख होण्याचं कारण नाही, असे खासदार बजरंग सोनावणे म्हणाले.
advertisement
बजरंग सोनावणे म्हणाले, पवार कुटुंब हे कुटुंब म्हणून एकत्रच आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र आल्यास मला आनंदच होईल. परंतु याबाबतचा जो काही अंतिम निर्णय असेल तो आमचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हेच घेतील आणि ते जे काही निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहणार आहे.
एकत्र झाले तरी आम्हाला दु:ख होण्याचं कारण नाही : बजरंग सोनावणे
दिल्लीमध्ये काम करण्यासाठी सुप्रियाताईंसारखा हातखंडा असणारा महाराष्ट्रातील दुसरा कोणीही व्यक्ती नाही. विरोधी पक्षात आहे असं आम्हाला कधीही वाटत नाही कारण आमचे सर्व प्रोजेक्ट मंजूर झाले आहे. राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्हला आनंदच आहे. पवार साहेबांना आम्ही मानतो, सुप्रियाताईला देखील मानतो. अजितदादांना मी कधी काही बोललो नाही. त्यांच्या परिवाराचा प्रश्न आहे जरी ते एकत्र झाले तरी आम्हाला दु:ख होण्याचं कारण नाही. पवार साहेब आणि ताई जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे खासदार बजरंग सोनावणे म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार?
पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याबाबत भाष्य केलं. सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.