नेमकं काय घडलं?
महादेव-पार्वतीनगर भागात राहणारे बालाजी सोमवंशी यांनी शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत कांबळे (रा. जेवळी) याला हटकले होते. कांबळे हा सोमवंशी यांच्या घरासमोर दारू पिऊन आरडाओरड आणि शिवीगाळ करत होता. "आमच्या दारात गोंधळ का घालता? इथे महिला राहतात," असं बालाजी यांनी विचारलं. याचा राग आल्याने संशयित कांबळे याने "तू मला विचारणारा कोण?" असे म्हणत थेट बालाजीच्या पोटात चाकू खुपसला.
advertisement
बचावासाठी धावलेल्या भावावर आणि आईवरही वार
हल्ल्याचा हा प्रकार पाहून बालाजीचा भाऊ नागेश सोमवंशी भांडण सोडवण्यासाठी धावला. मात्र, संतापलेल्या कांबळेने त्याच्याही पोटात चाकू मारला. आपल्या दोन्ही मुलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई चंद्रकला सोमवंशी मुलांच्या बचावासाठी धावल्या. निर्दयी संशयिताने दया माया न दाखवता त्यांच्याही पोटावर चाकूने गंभीर वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यानंतर संशयित चंद्रकांत कांबळे घटनास्थळावरून पसार झाला होता. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
