HRA क्लेमसाठी नवे नियम लागू होणार
केंद्र सरकारने यासाठी सुधारित मसुदा नियम आणि नवीन फॉर्म जाहीर केले आहेत. अंतिम अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर हे नियम अंमलात येतील. या बदलांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ‘फॉर्म १२४’ची अंमलबजावणी. या नव्या फॉर्मनुसार, HRA क्लेम करताना कर्मचाऱ्यांना ज्या व्यक्तीला भाडे दिले जाते, त्या घरमालकाशी आपले कौटुंबिक किंवा इतर कोणतेही नाते आहे का, याची स्पष्ट माहिती द्यावी लागणार आहे. सध्याच्या नियमांमध्ये अशी माहिती देणे आवश्यक नव्हते.
advertisement
खोट्या भाडेपावत्यांवर बसणार आळा
या नव्या तरतुदीमागचा मुख्य उद्देश म्हणजे करचुकवेगिरीवर आळा घालणे. अनेक प्रकरणांमध्ये करदाते कर वाचवण्यासाठी खोट्या भाडेपावत्या सादर करत असल्याचे आढळून आले आहे. विशेषतः काही जण आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावावर भाडे दाखवून HRA सवलत घेतात. मात्र, नव्या नियमांनुसार नातेसंबंध जाहीर करणे बंधनकारक झाल्यामुळे अशा व्यवहारांची पडताळणी अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, HRA दाव्यांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल, असे कर तज्ज्ञांचे मत आहे.
कोणती माहिती द्यावी लागणार?
नवीन नियमांनुसार, HRA क्लेम करताना पगारदार करदात्यांना घरमालकाची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये घरमालकाचे पूर्ण नाव, पत्ता, कायम खाते क्रमांक (PAN) आणि करदात्याशी असलेले नाते यांचा समावेश असेल. त्यामुळे कर विभागाला व्यवहारांची अचूक पडताळणी करणे सोपे जाईल.
कुटुंबीयांना भाडे देण्यावर बंदी नाही, पण अटी लागू
दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना भाडे देण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, अशा व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी काही अटी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैध भाडेकरार असणे आवश्यक आहे. तसेच, भाडे रोख स्वरूपात न देता बँकेद्वारे देणे अपेक्षित आहे, जेणेकरून व्यवहारांचा पुरावा उपलब्ध राहील.
