नागपुरात स्वर्गीय प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार वितरण सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते. कुशल संघटक म्हणून रविंद्र फडणवीस यांना पुरस्कार देण्यात आला. रविंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख गडकरी यांनी वाचला. सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून रविंद्र फडणवीस यांनी काम केल्याचे सांगत त्यांच्या शैक्षणिक कामाचा विशेष गौरव गडकरी यांनी केला.
advertisement
सरकार विरोधात न्यायालयात याचिका करणारे काही लोक समाजात असायला हवेत
रविंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थांच्या असोसिएशनला एकत्र करून रविंद्र फडणवीस हे अनेकदा उच्च न्यायालयात गेले. त्यांनी महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय फिरविण्याचे काम केले. जे योग्य असेल त्याच्याकरिता संघर्ष करताना रविंद्र फडणवीस यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही, असे सांगताना सरकार विरोधात न्यायालयात याचिका करणारे काही लोक समाजात असायला हवेत कारण जे न्यायालयाच्या आदेशाने होते, ते कधी कधी मंत्री करू शकत नाही, असे रोखठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
लोकप्रिय राजकारणाच्या नादात कधी कधी मंत्र्यांची अडचण होते, त्यामुळे...
वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार लोक जे सरकारविरोधात सातत्याने लढत असतात, न्यायालयीन पातळीवर संघर्ष करीत असतात, असे लोक समाजात असायला हवेत. लोकप्रिय राजकारणाच्या नादात कधी कधी मंत्र्यांची अडचण होते. निर्णय घेताना कठीण जाते. जर सरकारविरोधात न्यायालयात याचिका करणारे काही जाणकार लोक समाजात असतील तर कधी कधी काम सोपे होते, असे गडकरी म्हणाले.