राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे खूप आधीच पाठवण्यात आला आहे. मात्र, त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड जाहीर करण्याची मागणी जाधव यांनी केली. तर, दुसरीकडे राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी भास्कर जाधवांऐवजी ठाकरे गटातील दुसराच नेता विरोधी पक्षनेते पदी येईल, असे म्हणत डिवचलं. उद्धव ठाकरेंकडून भास्कर जाधवांना झुलवलं जात असल्याचे म्हटले.
advertisement
जाधव-सरनाईकांची भेट...
विरोधी पक्षनेते पदाची चर्चा जोरात असताना दुसरीकडे भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यात नागपूरमधील हॉटेलच्या लॉबीत १० ते २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत दोनच नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
ऑपरेशन टायगर सुरूच, पण... प्रताप सरनाईक काय म्हणाले?
भास्कर जाधवांसोबत झालेल्या भेटीबाबत प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले. सरनाईक यांनी म्हटले की, भास्कर जाधव आणि मी एकत्र काही वर्ष काम केलं आहे. विधानसभेतील ते जुने मित्र आहेत. ते राष्ट्रवादीचे मंत्री असताना माझ्या मतदारसंघाशी निगडीत कामे घेऊन जायचो. त्यावेळी त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळायचा. मी परिवहन मंत्री आहे. त्यांच्या मतदारसंघातील एसटीबाबतचे प्रश्न, नवीन एसटी, बस मार्गाबाबत त्यांनी चर्चा केली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. आमचे ऑपरेशन टायगर सुरूच आहे, मात्र, त्याचा आजच्या जाधवांच्या भेटीशी काही संबंध नसल्याचे प्रताप सरनाईकांनी सांगितले.
