तो सुखाचा क्षण अन् क्षणात काळोख...
मंगळवारी सकाळी करुणा नेहमीप्रमाणे पती सुभाषसोबत विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. दोघेही आनंदाने काम करत असताना अचानक करुणाचा पाय घसरला आणि ती थेट विहिरीत पडली. विहीर खोल होती, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी ती धडपडू लागली. पत्नी पडल्याचा आवाज ऐकताच सुभाषने हातातील हंडा खाली फेकला आणि क्षणभराचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी विहिरीत झोकून दिले.
advertisement
जीवापाड प्रेम अन् हतबलता
सुभाषला पोहता येत नव्हते, पण बुडणाऱ्या पत्नीला पाहून त्याचे प्रेम कर्तव्याच्याही पलीकडे गेले होते. तिला वाचवण्याच्या नादात तो स्वतःही बुडू लागला. सुदैवाने, जवळच असलेल्या नाना निकम यांनी प्रसंगावधान राखले आणि तातडीने धाव घेऊन सुभाषला विहिरीबाहेर काढले, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र, करुणा खोल पाण्यात गेल्याने तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपुरे पडले.
संसाराची स्वप्ने अधुरीच राहिली
सोयगाव तालुक्यातील घोसला येथील करुणाचा विवाह अवघ्या ७ महिन्यांपूर्वी पळशीच्या सुभाषसोबत झाला होता. दोघेही आपल्या छोट्याशा जगात सुखी होते. मात्र, एका पत्नीचा पाय घसरला अन् ती विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. विष्णू बडक आणि राहुल निकम यांनी मोठ्या कष्टाने करुणाचा मृतदेह बाहेर काढला.
आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
ज्या मुलीला सात महिन्यांपूर्वी हसत-खेळत सासरी पाठवले, तिचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता. करुणाच्या पश्चात पती, सासू, दीर आणि तिचे आई-वडील असा मोठा परिवार असून, या घटनेने निकम वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी ५ वाजता करुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
