विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायात शाकाहार हा सर्वश्रेष्ठ हार मानला जातो. मांसाहार, मद्यपान अशा गोष्टींना वारकरी सांप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये थारा नाही. अशातच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे. विठ्ठल मंदिरामध्ये बीव्हीजी कंपनीकडून आउट सोर्सिंग पद्धतीने सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी पुरवले जातात. याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
आज मसाले वाटले उद्या चिकन वाटतील, मंदिर परिसरात संताप
बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी असलेले माऊली महाराज शिरवळकर म्हणाले, दिवाळीत लाडू, चिवडा खायचे दिवस आहे आणि या दिवसात आता चिकन मसाला वाटत आहेत. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की, दिवाळीला मिठाई,लाडू, चिवडा गिफ्ट द्यायला हवा. पाडुंरगाच्या पवित्र मंदिरात आपल्याला सेवा करण्याचे भाग्य मिळत आहे त्याठिकाणी हे चिकनची पाकिटे वाटत आहेत. त्यामुळे उद्या हे चिकन वाटायला कमी करणार नाही.
मंदिर समितीतर्फे नोटीस पाठवली
या प्रकाराबाबत बोलताना विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी म्हटले की, दिवाळीत मुलांना सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक फक्त पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत. आपण सुरक्षारक्षक खाजगी कंपनीकडून घेतलेले आहेत. बीव्हीजी कंपनीकडून सुरक्षारक्षकांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. त्यामध्ये मसाले आहेत आणि त्याच्यामध्येच चिकन मसाला सुद्धा आहे. ही घटना लक्षात येताच ताबडतोब कंपनीने वाटप थांबवलेलं आहे . मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे. मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहेत सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीस दिलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे.