पनवेल शहरातील तक्का विभागात एका मुलींच्या बालगृहाच्या बाहेर फुटपाथवर आज सकाळी एक नवजात अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. २० दिवसांच्या या अर्भकाला एका बास्केटमध्ये ठेवून सोडण्यात आले होते. या बास्केटमध्ये एक चिठ्ठीही सापडली, ज्यात 'आम्ही या बाळाला सांभाळू शकत नाही. त्याच्या आजारपणाचा खर्च आम्हाला झेपणार नाही, क्षमा असावी,' अशी चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
हर्षवर्धन पाटलांचा गेम, पवारांना धक्का, इंदापूरचा जायंट किलर नेता भाजपात जाणार, पक्षप्रवेश कधी?
आज सकाळी नागरिकांना हे अर्भक फुटपाथवर एका चांगल्या पेटीमध्ये ठेवलेले दिसले. रात्रीपासून ते बाळ त्या ठिकाणी रडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. हे अर्भक सोडलेल्या ठिकाणी दुधाची बाटली आणि 'सेरेल्याक' (बाळाचे अन्न) देखील ठेवण्यात आले होते.
ही घटना एका चांगल्या वस्तीमध्ये, महत्त्वाच्या मार्गावर घडली आहे, ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बाळावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर बाळाला पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पनवेल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अर्भकाला सोडून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.