Panvel Crime News : विश्वनाथ सावंत, नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत खूनाच्या आरोपाखाली जामीनावर सुटलेल्या आरोपीने सोसायटीत धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर आरोपीने स्वतःच्या भावाच्या 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवत तिच्या गळ्यावर कोयता ठेवून धमकावल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून प्रकरणात जामीनावर सुटलेला आरोपी सोबन बाबुलाल महातो याने पनवेलच्या मंगला निवास इमारतीत गोंधळ घातला होता.या संबंधित तक्रार इमारतीतील काही नागरीकांनी पोलीस ठाण्यात केली होती. सोबन बाबुलाल महातो हा कुऱ्हाड आणि कोयता घेऊन घराच शिरल्याची माहिती तक्रारदार नागरीकांना पोलिसांना दिली होती.
या संबंधित तक्रार मिळताच आरोपी सोबन महातो एका घराचे कुलूप तोडून घरात शिरला होता. यावेळी त्याच्याआधी त्याचे आई वडील आणि पुतण्या आणि पुतणी देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांनी ज्यावेळेस त्याला घराबाहेर येण्याचे आवाहन केले, त्यावेळेस तो आई वडिलांना पुढे करून त्यांचा जीव घेईन,अशी धमकी देत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून आतमध्येही शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याने कुऱ्हाडीने पोलिसांवर हल्ला केला आणि आतून दरवाजा लावून घेतला होता.
त्यानंतर पून्हा पोलिसांकडून त्याला समजावण्याचा प्रयत्न झाला. पण तरी तो ऐकायला तयार नव्हता.त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं. त्याच्या सहाय्याने पोलिसांनी सेफ्टी डोअर तोडलं.त्यानंतर त्याच्यावर चिली स्प्रेचाही वापर करण्यात आला होता.तरी देखील तो नियंत्रणात येत नव्हता. त्यानंतर पोलीस जेव्हा दरवाजा तोंडून आत शिरले त्यावेळेस त्याने त्याच्या 16 वर्षाच्या पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली.
अशा परिस्थितीत पोलिसांनी शातं डोक्याने आणि संयमाने त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्यावर झडप घातली. आणि त्याच्या ताब्यातील पुतणीची सूटका केली. तसेच पोलीस जेव्हा त्याला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत असताना त्याने पोलिसांवर कोयत्याने वार केले.या हल्ल्यात सम्राट डाकी आणि रविंद्र पारधी हे दोन पोलीस गंभीर जखमी, तर माधव शेवाळे आणि साईनाथ मोकल किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर सोबन महतोला अटक करण्यात आली आहे. आणि त्याच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.