परभणी: राज्यातील अनेक विवाहित महिला सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या घटना समोर येत असतानाच, परभणी शहरात याउलट प्रकार उघडकीस आला आहे. सुनेच्या हट्टाला कंटाळून एका सासूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासूचे नाव अनुराधा शिसोदे आहे.
ही घटना परभणीतील उच्च शिक्षित आणि संपन्न कुटुंबात घडली आहे. मृतक अनुराधा शिसोदे या निवृत्त उपकोषागार अधिकारी होत्या. त्यांचे पती नंदकुमार शिसोदे हे पोलिस दलात कार्यरत आहेत. कुटुंबात मुलगा आणि मुलगी असून, दोघेही डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे हे कुटुंब समाजात आदर्श मानले जात होते.
advertisement
शिसोदे यांच्या मुलाचा एप्रिल 2025 मध्ये दैठणा येथील सुषमा कच्छवे हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत चालले. मात्र काही दिवसांनी सुनेने घरात वेगळाच हट्ट सुरू केला. "मी घरातील कामे एकटीच का करू, "मी तुमच्या घरातील नोकर आहे का, मला सरकारी नोकरी लावा मी तुमचे घर राखणार नाही, फक्त घरात बसायला वॉचमन आहे का?” असा तगादा लावला होता . या कारणावरून घरात वाद निर्माण होत होते. त्यानंतर सासू अनुराधा यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरात कोणालाही काही कमी नाही, तुम्ही दोघांनी (मुलगा-सून) एकत्र प्रॅक्टिस करावी" असे त्यांनी सांगितले, पण सुनेने ऐकले नाही.
सुनेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल
सासूने समजवल्यानंतर देखील सुनेने आपला हट्ट कायम ठेवून सर्वांनाच वेठीस धरत होती. सासूला सतत "सर्व काही तुमच्यामुळेच होत आहे, तुम्ही मरा कुठेतरी जावून" असे म्हणत वारंवार मानसिक त्रास देत होती आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत होती. सासू अनुराधा शिसोदे यांना सुनेचे वागणे सहन होत नव्हते. सततच्या त्रासामुळे आणि मानसिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येमुळे केवळ कुटुंबातच नव्हे, तर समाजातही खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी मृतक अनुराधा शिसोदे यांच्या सुनेविरुद्ध तसेच सुनेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
सुनेच्या त्रासाला कंटाळून सासूची आत्महत्या
घटनेमुळे परभणी शहरात विविध स्तरांतून चर्चा रंगल्या आहेत. सासरच्या जाचामुळे सुना आत्महत्या करतात, असे अनेकदा घडते. पण सुनेच्या त्रासाला कंटाळून सासूने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कौटुंबिक नातेसंबंधातील बदलत्या समीकरणांवर आणि घरगुती तणाव किती टोकाला जावू शकतो यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.