इम्रान शेख ऊर्फ छोटेबाबा असं गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. त्याच्यासह पोलिसांनी इम्रानला मदत करणारे त्याचे वडील सुभान शेख, आई सगिरा, बहीण हुसैना आणि मेहुणा फक्रुद्दीन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. योग शिकवण्याच्या नावाखाली घरी बोलवून एका तरुणीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय पीडित तरुणी एक योग प्रशिक्षक आहे. तिचे आई-वडील आर्थिक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी मुंब्रा दत्तूवाडी येथे राहणाऱ्या सुभान शेख ऊर्फ नारीयलवाला बाबा याच्याकडे जात असत. हा सुभान शेख स्वतःला 'बडेबाबा' म्हणवून घेत असे, तर त्याचा मुलगा इम्रान शेख याला 'छोटेबाबा' म्हणून ओळखले जाई.
योगासाठी घरी बोलवून अत्याचार
पीडितेच्या कुटुंबाच्या या भेटींचा फायदा घेऊन 'छोटेबाबा' इम्रानने तरुणीला योगाचे खासगी क्लास घेण्याचा सल्ला दिला. याच सल्ल्याच्या आधारावर त्याने तरुणीला 'आपल्या मित्राला योगा शिकायचा आहे' असं सांगून मित्राच्या घरी बोलावले. मित्राच्या घरी नेत त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आणि तिचे व्हिडीओ शूट केले.
जादूटोणा करून कुटुंबाला संपवण्याची धमकी
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अत्याचाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, इम्रानने तरुणीला जादूटोणा करून तिच्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देत तिच्यासोबत बळजबरीने लग्न केले. विशेष म्हणजे यापूर्वी इम्रानचे दोन लग्नं झाली होती, तरीही त्याने पीडितेसोबत तिसरं लग्न केलं. या सर्व कटकारस्थानात त्याचे संपूर्ण कुटुंब सामील असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
पीडित तरुणीने शेवटी धीर धरून डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार कथन केला. पोलिसांनी 'छोटेबाबा' इम्रान शेखसह त्याच्या वडिलांवर, आईवर, बहिणीवर आणि मेहुण्यावर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
