अजित पवार यांच्याच नेतृत्वात २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक लढला. मात्र शहराचा चौफेर विकास केल्याचा दावा करूनही राष्ट्रवादीच्या वाट्याला निराशा आली. ज्या विठ्ठल मुर्ती घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीविरोधात रान उठवले, त्या मुद्द्याला पिंपरी चिंचवडकरांनी साथ दिली. आता तोच मुद्दा आठ नऊ वर्षांनी अजित पवार यांनी पुन्हा जिवंत करून भ्रष्टाचाराच्याच मुद्द्यावरून भाजपवर प्रहार करणार असल्याचे संकेत दिले.
advertisement
पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल मुर्ती घोटाळा नेमका काय होता?
आषाढी एकादशीच्या निमित्ताने २०१६ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वारीतील दिंडी प्रमुखांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. या मूर्तींच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केला होता. बाजारात मूर्तींची किंमत अत्यंत कमी होती, मात्र अव्वाच्या सव्वा दराने किंबहुना अंदाजे दुप्पट ते तिप्पट किमतीत महापालिकेने मूर्ती खरेदी केल्याचा आरोप भाजपने केला.
परिणामी २०१७ च्या निवडणुकीत भाजपने विठ्ठल मूर्ती घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर सनसनाटी आरोप केला. देवाच्या मूर्तींच्या खरेदीतही राष्ट्रवादीने पैसे खाल्ले, असा प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. लोकांनीही भाजपच्या प्रचाराला साथ देऊन सत्तेवर आणले.
भाजपच्या आरोपांची चौकशी झाली, समोर पुरावे सापडले नाहीत
भाजपने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. चौकशी अहवालानुसार, या खरेदीत आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट पुरावे सापडले नाहीत, मात्र प्रशासकीय अनियमितता झाल्याचे पुढे आले. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल महापालिकेतील एका लेखापालाची आणि एका कारकुनाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली होती.
अजित पवारांनी हा मुद्दा आत्ताच का काढला?
अजित पवारांनी आज हा मुद्दा का काढला? कारण या जुन्या मुद्द्याचा संदर्भ देऊन अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केल्याची चर्चा आहे. मूर्ती खरेदी प्रकरणात केवळ आरोप झाले मात्र तसा तो घोटाळा नव्हताच. पण सध्या भाजपच्या सत्ता काळात रस्ते, निविदा आणि थेट महापालिकेच्या ठेवींमध्येच घोटाळे होत आहेत. मग जनता एवढ्या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणार का? असा सवाल करून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अजित पवार भाजपला खिंडीत गाठू पाहत आहेत.
