मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही एक ट्रक शहरात शिरला. यावेळी वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांनी ट्रक चालकाला अडवले. मात्र, केवळ चूक समजावून सांगण्याऐवजी किंवा रीतसर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी ट्रक चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थित नागरिकांनी या मारहाणीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला, जो काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी चालकाला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत.
advertisement
आमदारांची एन्ट्री आणि पोलिसांची भंबेरी
ही घटना घडत असताना आणि पोलीस आणि चालक यांच्यात हुज्जत सुरू असतानाच मोहोळचे आमदार राजू खरे तिथे पोहचले. त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांना कडक शब्दांत सुनावले.
2000 ची लाच आणि भ्रष्टाचाराचे आरोप
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ट्रक चालकाने पोलिसांवर केलेले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. "साहेबांनी आधी माझ्याकडून 2000 रुपये घेतले आणि गाडी सोडली. पण त्यानंतर पुन्हा मला कोर्टात जाऊन चलन भरण्यास सांगितले," असे पीडित ट्रक चालकाने माध्यमांशी बोलताना सांगितले. पैशांची देवाणघेवाण करूनही पुन्हा कायदेशीर कारवाईची भीती दाखवल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आश्वासन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आमदार राजू खरे यांनी संबंधित दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मारहाणीमुळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पंढरपूर पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले असून, सामान्य नागरिकांमधून पोलिसांच्या या 'खाकी' मग्रुरीचा निषेध केला जात आहे.
