स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावी, अशी भूमिका समोर येताच प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, असं सांगण्यात आले. शरद पवार असो किंवा अजित पवार असो, यांच्यावर माझं प्रेम आहे आणि राहील. पण 2023 मध्ये माझ्यावर दबाव असूनही मी शरद पवारांची साथ सोडली नाही. विचारांच्या मुद्यावर शरद पवार यांना साथ दिली. पण, आता भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला विरोध असल्याचे जगताप यांनी म्हटले.
advertisement
दोन दिवसांपूर्वी राजीनाम्याचा निर्णय अधिकृतपणे सांगताना, प्रशांत जगताप यांनी म्हटले होते की, २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल ! आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, असेही जगताप यांनी म्हटले.
प्रशांत जगतापांचं ठरलं...
राज्याच्या राजकारणात आज दुपारी महत्त्वाची घडामोड घडणार आहे. प्रशांत जगताप आज दुपारी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रवेशामुळे काँग्रेसला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, असा अंदाज आहे.
