नेमका काय घडला प्रकार?
मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप राठोड हे उत्साहाने या कार्यक्रमाचे नियोजन करत होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ शाळेच्या प्रांगणात मोठ्या संख्येने जमा झाले होते.
ध्वजारोहणापूर्वीच नियतीनं घात केला
advertisement
मुख्याध्यापक दिलीप राठोड हे ध्वजारोहणासाठी पुढे सरसावले. तिरंगा फडकवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत तीव्र कळा आल्याने काही क्षणातच ते सर्वांसमोर जमिनीवर कोसळले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि उपस्थित ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी वेळ न दवडता त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिलीप राठोड यांनी आपल्या कर्तव्यावर असतानाच आणि राष्ट्रध्वजासमोरच अखेरचा श्वास घेतल्याने मोहेगावसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
