कोरोना काळात सर्वत्र भीती पसरलेली असताना रुग्णांना आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना सातासमुद्रापल्याडहून आधार देणारे डॉक्टर, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते, लोकशाहीवादी कार्यकर्ते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी दोन वेळा चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच त्यांना ब्रिटनला जाण्यापासून अडवले. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयात काय घडले?
दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी तसेच लुक आऊट सर्कुलर (एलओसी) विरोधात संग्राम पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीत संग्राम पाटील यांच्याविरोधात काढण्यात आलेली एलओसी बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद संग्राम पाटील यांच्या वकिलांकडून करण्यात आला. तर संग्राम पाटील तपासाला सहकार्य करत नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले.
advertisement
भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी संग्राम पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांची चौकशी केली जात आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० जानेवारीला दाखल होताच संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच १९ तारखेला ब्रिटनला जाण्याापसून त्यांना रोखण्यात आले होते. या सर्व प्रकाराविरोधात संग्राम पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
कोण आहेत संग्राम पाटील?
डॉ. संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे. अनेक वर्षांपासून ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा बजावतात. ब्रिटनमध्येच ते स्थायिक झाले आहेत. भारतातील राजकीय- सामाजिक घडामोडींवर त्यांची करडी नजर असते. केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्वायत्त संस्थांच्या न पटणाऱ्या निर्णयांविरोधात ते रोखठोकपणे आपली मते मांडत असतात. समाज माध्यमांवरून त्यांना पाहणारा आणि ऐकणारा प्रेक्षक वर्गही मोठा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेली काही वर्षे ते आवाज उठवत आहेत.
