शाळकरी मुलगा आयुष कोमकरच्या हत्येने पुण्यासह महाराष्ट्र हादरून गेला होता. कोमकर याच्या हत्याकांडातील आंदेकर टोळीतील सर्वच आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल होण्याच्या आधीच आंदेकर टोळीतील नंबरकाऱ्याच्या भावाला ठार केल्याने पुणे पोलिसांच्या डोळ्यासमोर टोळीयुद्धाचा रक्तरंजित थरार सुरू असल्याचे दिसते.
घटना नेमकी कशी घडली?
कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात २ आरोपींनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळे याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळे याला लागल्या. तो गतप्राण झाला. त्याचवेळी दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर कोयत्याचे वार केले. काही मिनिटांतच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोन आरोपी गणेशच्या मागावर होते. त्यांनी गणेशला रिक्षात बसू दिले, काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशला लक्ष्य केले.
advertisement
गणेश काळे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी आहे. तो अजूनही तुरूंगात आहे. गणेशवर गोळीबार करण्याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
हे टोळीयुद्ध नाही, पुणे पोलिसांची माहिती
पुण्यात भडकलेल्या टोळीयुद्धाची चर्चा होत असताना गणेश काळे याच्यावरील हल्ला हा टोळीयुद्धातून झालेला नाही, असे स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितले. गणेशच्या खुनाचे कारण आम्ही लवकरच शोधून काढू, आरोपींना देखील लगोलग अटक करण्याचा प्रयत्न करू, असे पुणे पोलिसांनी सांगितले.
