पुण्यातील बाजीराव रोडवर मंगळवारी दुपारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मयंक खरारे या १७ वर्षीय मुलाची भर चौकात हत्या करण्यात आली. दुचाकीवरून चाललेल्या तिघांवर आरोपींनी कोयत्याने वार केले. प्राणघातक हल्ल्यात मयंक खरारे हा मृत्यूमुखी पडला तर दुसऱ्या एका तरुणालाही गंभीर दुखापत झाली. घटना घडल्यानंतर ५ तासांत पुणे पोलिसांनी आरोपींना अटक केली.
advertisement
ज्यांना मारले ते अल्पवयीन, ज्याचा मृत्यू झाला तो ही अल्पवयीन
बाजीराव रोड हत्या प्रकरणातील मृत युवक मयंक खरारे हा अल्पवयीन होता तर ज्यांनी त्याला मारले ते तिन्ही आरोपी अल्पवयीन होते. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पूर्णवैमनस्यातून त्यांनी कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांच्या डोळ्यासमोर पुण्यात रक्ताचा सडा पडतोय
पुण्यातील टोळीयुद्ध आणि त्यांच्यातील संघर्षातून गेली अनेक महिने रक्तरंजित थरार सुरू आहे. कधी आंदेकर-कोमकर टोळीतल्या संघर्षातून खून होतोय तर कधी आपला दबदबा राहावा यासाठी घायवळ टोळीतल्या सदस्यांकडून नागरी भागात गोळीबार केला जातोय. एकंदर पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांनी पुणे पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, पण त्यांना तूर्तास तरी यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
मारणे, कोमकर आणि आंदेकर टोळीला गजाआड केल्यानंतर पुण्यातील टोळीयुद्ध शमल्याचे पुणे पोलीस अभिमानाने सांगत होते. परंतु पोलिसांना थेटपणे कृतीतून आव्हान देऊन टोळीतील सदस्य एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.
