मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील उमरती या गावात ही धडक कारवाई केली. या कारवाईचं नेतृत्व पुण्याचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी केलं. यात इतर १०५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. पोलिसांनी एकूण चार कारखाने उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे.
या कारवाईत पोलिसांनी 100 पेक्षा अधिक गन बॅरलसह ५ मॅगझिन १४ ग्रेंडिंग मशीन २ पिस्तूल ४ काडतुसे जप्त केले आहेत. तसेच यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या ४७ जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सर्वजण संबंधित कारखान्यात बेकायदेशीरपणे हत्यारं बनवत होते. अशाप्रकारे वेगळ्या राज्यात जाऊन पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.
advertisement
खरं तर, पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. अनेक अल्पवयीन मुलांकडे बेकायदेशीर हत्यारं आणि बंदुका आढळून आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांना या शस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेशातून होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून मध्य प्रदेश गाठले.
उमरती गावात टाकलेल्या या धाडीत काही लोक बेकायदेशीरपणे हत्यारं बनवताना आढळले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ४७ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली आहे. अद्यापही संबंधित कारखान्याची आणि परिसराची पुणे पोलिसांकडून कसून झडती घेतली जात आहे. पुणे शहरात होणारा अवैध शस्त्रपुरवठा पूर्णपणे थांबवण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
