पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळविरुद्ध पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. घायवळची आणखी एक आलिशान कार उसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती. ती पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही कार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या खर्डा गावात लपवून ठेवण्यात आली होती. ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली ही गाडी थेट पुणे पोलिसांनी जाऊन जप्त केली.
advertisement
याआधी पोलिसांनी घायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकला होता. त्यानंतर त्याची बँक खाती गोठवली गेली. आता पोलिसांच्या साखळी कारवाईमुळे त्याचे आर्थिक आणि कायदेशीर आव्हान अधिक तीव्र झाले आहे.
>> पासपोर्ट रद्द
मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हेगारी कारवायांमध्ये अडकलेला निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. तपासात त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाने पासपोर्ट मिळवल्याचाही खुलासा झाला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी अहवाल सादर केला होता.
आता प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून अधिकृत आदेश जारी होत घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या परदेशातील हालचालींवर मोठा मर्यादा लागू शकते.
>> बँक खाती गोठवली...
निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 10 बँक खाती पुणे पोलिसांनी गोठवली आहेत. या खात्यांमध्ये 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात समोर आले. निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, ‘पृथ्वीराज एंटरप्रायजेस’ यांच्या खात्यांचा समावेश आहे. या खात्यांवरील व्यवहारांसाठी आता पुणे पोलिसांची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) आवश्यक आहे. त्यामुळे या खात्यातून पैसे काढणे किंवा व्यवहार करणे पूर्णपणे थांबले आहे.
