निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारयाद्यांत सर्वत्र मोठा घोळ असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. संगमनेर नगरपालिका निवडणूक मतदारयाद्यांत साडेनऊ हजार नावांमध्ये गडबड असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय. तक्रार करूनही काही दाद देत नसल्याने निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू असल्याचेही थोरात म्हणाले.
विखेंसह खताळांचा थोरातांवर दुहेरी हल्ला
गेली चाळीस वर्ष तुम्हीच संगमनेरचे आमदार होतात. मात्र मतदार वाढवूनही तुमचा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब थोरात यांनी हा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
advertisement
बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणारे आमदार अमोल खताळ यांनीही थोरातांवर पलटवार केला आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेले नाही. जनतेला गृहित धरल्यानेच तुमचा पराभव झाला, अशी टीका अमोल खताळ यांनी केली.
थोरातांचा आरोप काय आहे?
संगमनेर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्राबाहेरील सुमारे ९,४६० मतदारांबाबत हरकती नोंदवल्या गेल्या. त्या हरकतींवर तहसीलदारांनी सांगितले की, मूळ विधानसभा मतदार यादीतील नावे वगळणे किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला किंवा त्याने नेमलेल्या अधिकाऱ्यांना नाही. शेकडो हरकतींना हेच उत्तर देण्यात आले.
नगरपालिका क्षेत्रातील मयत, दुबार, फेक मतदारांबाबतही अशाच हरकती घेतल्या, पण "आम्हाला अधिकार नाही" म्हणून सांगण्यात आले. एकीकडे निवडणूक आयोग म्हणतो, "आम्ही तपासून निर्णय घेऊ", दुसरीकडे "आम्हाला अधिकारच नाही" असे सांगतो. मग मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा हा सारा कार्यक्रमच कशासाठी? जर अधिकारच नसेल, तर थेट यादी जाहीर करा... हरकती मागवून लोकशाही मार्गाने काम करतो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न तरी कशाला करता? मतदार यादीत हजारो नावांबाबत संभ्रम असेल, तेव्हा "विहित नमुन्यात अर्ज करा" असे सांगून निवडणूक आयोग नेमके काय साध्य करू पाहत आहे... निवडणूक आयोग खरेच हा घोळ तपासणार आहे की नाही?