महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा गुरुवारी मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्याला मनसेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली होती. मतदान यंत्राच्या घोळाबाबत किंबहुना मतचोरी कशी होऊ शकते, याचे प्रात्याक्षिक मनसेच्या मंचावर उपाध्याय आणि पटेल नामे गृहस्थांनी सादर केले. त्यानंतर केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी स्वच्छ मतदार याद्यांचा आग्रह धरत १ तारखेच्या मोर्चाला येण्याची विनंती केली.
advertisement
मला मुख्यमंत्री करा यासाठी किती लाचारी करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. एकनाथ शिंदे यांच्या पर्यटन विभागाने त्यासंदर्भात शासकीय अध्यादेश देखील काढला आहे. मला मुख्यमंत्री करा, यासाठी किती लाचारी करणार? तुम्ही असले प्रकार करून किती लाचारी करताय, हे मोदींना माहितीही नसेल, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.
किल्ल्यांवर नमो टुरिझम सुरू केले तर फोडून टाकेन
नमो टुरिझम सेंटर जर किल्ल्यांवर सुरू केले तर आम्ही मागे पुढे न पाहता फोडून टाकणार, असे खुले आव्हान राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले. गड किल्ल्यांवर केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असायला हवे, असे राज ठाकरे म्हणाले.
मतदारयाद्या स्वच्छ करा, नंतरच निवडणुका घ्या
लोक आपल्याला मतदान करतायेत पण मतदारयाद्यातील आणि मतदान यंत्रातील घोळामुळे आपला पराभव होतोय, असा दावा राज ठाकरे यांनी केला. गेल्या १०-१२ वर्षांपासून असले सुरू झाले आहेत. असले प्रकार करून सत्तेत यायचे, सत्ता राबवायची असा सत्ताधाऱ्यांचा पवित्रा आहे. परंतु निवडणूक आयोगाला इशारा देतोय की मतदारयाद्या स्वच्छ करा, नंतर निवडणुका घ्या, असे राज म्हणाले.
