गुरुवारी सकाळी राज ठाकरे मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचले. त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा पोहचला. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर काही वेळेत शिक्कामोर्तब झाले. एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आज राज यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकच मोठी राजकीय खळबळ उडाली.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची जवळपास तासभर चर्चा झाली. या तासभराच्या चर्चेत आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेलमधून निघाले मात्र, राज ठाकरे हॉटेलमध्येच थांबले.
राज ठाकरे यांनी दिले महत्त्वाचे आदेश....
राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद साधला असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिले. राज ठाकरे यांनी या पदाधिकार्यांना आजच्या बैठकीबाबत कोणतेही भाष्य न करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. याआधीदेखील त्यांनी ठाकरे गटासोबतच्या युतीच्या चर्चेवर भाष्य न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतरही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना देत कोणतेही भाष्य न करण्यास सांगितले आहे.
राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे राज यांनी पदाधिकाऱ्यांना भाष्य न करण्याचे आदेश देणे ही मोठी घडामोड असल्याचे म्हटले जात आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा...
ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीआधी एकत्र येणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दोघांनी तसं सूचक संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते युतीबाबत सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात परदेशात भेट झाली होती. ठाकरे बंधूंमध्ये ही गुप्त भेट माध्यमांना चकवा देत परदेशात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. याआधी दोन्ही ठाकरे बंधू कौटुंबिक कार्यक्रमातही एकत्र दिसले होते.